नवी दिल्ली- दिल्ली महानगरपालिकेसाठी निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. ४२ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण १३४९ उमेदवारांच्या भवितव्याचा काही क्षणात फैसला होणार आहे. मात्र सध्याच्या कलानूसार आम आदमी पार्टीला बहुमत मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
सध्या हाती आलेल्या कलानूसार, आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. सर्व २५० जागांचे कल हाती आले आहेत. आप १३६ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा १०० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस १० आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आप सत्तेत येणार असल्याचे निश्चित झाले आहे. आम आदमीचा विजय होणार असल्याचे दिसून येत असले, तरी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघात वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे.
कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले!
अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ असलेल्या ७४मध्ये भाजपाचे रवींद्र कुमार सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. रविंद केजरीवाल हे चांदणी चौकाचे मतदार आहेत. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या लक्ष्मीनगर मतदारसंघात भाजपाच्या अलका राघव आघाडीवर आहेत. आपच्या मीनाक्षी शर्मा सध्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, बहुमतासाठी किमान १२६ जागा जिंकाव्या लागतील, MCD मध्ये एकूण २५० जागा आहेत. दिल्ली महानगरपालिका गेल्या १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. याअगोदर राजधानी महानगरपालिकेचे ३ भागात विभाजन करण्यात आले होते. एमसीडी निवडणुकीत एकूण १३४९ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी ३८२ उमेदवार अपक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने सर्व २५० जागांसाठी आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ २४७ उमेदवार उभे केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"