देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचे शेकडो महिलांसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने कर्नाटकसह देशाच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. दरम्यान, हे प्रकरण सुरुवातीला उघडकीस आणणारे भाजपा नेते जी. देवराजे गौडा यांना कर्नाटक पोलिसांना लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात अटक केली आहे. देवराजे गौडा यांनी कर्नाटकमध्ये भाजपा आणि जेडीएस यांच्यात आघाडी होण्यापूर्वी भाजपाच्या पक्षनेतृत्वाला पत्र लिहून अशी आघाडी न करण्याची विनंती केली होती. दरम्यान, देवराजे गौडा हे बंगळुरू येथून चित्रदुर्गच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
पेन ड्राईव्हच्या माध्यमातून व्हिडीओ लीक केल्याच्या आरोपाखाली देवराजे गौडा यांना हिरीयूर पोलिसांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुलिहाल टोल नाक्यावरून अटक केले. हासन पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर देवराजे गौडा यांना अटक करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले. पेशाने वकील असलेल्या देवराजे गौडा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर नोंदवण्यात आली होती. मात्र ही बाब प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणण्यामधील त्यांच्या भूमिकेनंतर समोर आली होती.
हासन जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीच्याआधारावर देवराजे गौरा यांच्याविरोधात एफआरआर नोंदवण्यात आली होती. देवराजे गौडा यांनी एक मालमत्ता विकण्याच्या कामात मदत करण्याच्या बहाण्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला होता.