देहराडून - आपल्या विधानांमुळे नेहमीच वादाच सापडणारे उत्तराखंडचे माजी मंत्री आणि कालाढुंगी येथील भाजपा आमदार बंशीधर भगत यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. हल्द्वानी येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमात भगत यांनी हिंदूंच्या देवी-देवतांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावेळी त्यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला आणि मुलींनाही धक्का बसला.
उत्तराखंडभाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले बंशीधर भगत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमासाठी हल्द्वानी येथे आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, मुलींचा नेहमी सन्मान केला जातो. तसाच मुलांनाही सन्मान मिळाला पाहिजेय यावेळी त्यांनी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गामातेबाबतही त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, विद्या, ज्ञान हवं असेल तर सरस्वतीला पटवा, शक्ती, बळ हवं असेल तर दुर्गामातेला पटवा आणि धन हवं असेल तर लक्ष्मीला पटवा, असं प्रक्षोभक विधान त्यांनी केलं. भगत एवढ्यावरच थांबले नाहीत, पुरुषांकडे काय आहे. एक पुरुष भगवान शिवजी आहेत. ते पर्वतात थंडीमध्ये जाऊन बसले आहेत. त्यांच्या डोक्यावर साप आहे आणि वरून पाणी पडतंय. तर दुसरे विष्णू समुद्राच्या तळाला लपले आहेत. दोघांमध्ये बोलणंही होत नाही, महिला सशक्तीकरण तर आधीपासून देवानेच करून ठेवलं आहे, अशी मुक्ताफळे भगत यांनी उधळली.
बंशीधर भगत यांची ही विधानं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना धक्का बसला. मात्र काही लोकांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली. मात्र या विधानामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पटवा शब्दाऐवजी देवी देवता यांना प्रसन्न करून घ्या हा शब्द वापण्याची परंपरा आहे, असे सांगितले.
बंशीधर भगत यांनी आक्षेपार्ह विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. ते नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी आधीही अशी विधाने केलेली आहेत. त्यांच्या अशा विधानांमुळे भाजपावरही अनेकदा नामुष्की ओढवली आहे. आता पुन्हा एकदा ते या विधानामुळे चर्चेत आले आहेत.