महादेव सट्टेबाजी ॲप घोटाळ्यातील आरोपी असीम दास याच्या वडिलांचा मृतदेह छत्तीसगडमधील दुर्ग एका गावामध्ये संशयास्पद स्थितीत सापडला. असीम दासचे वडील सुशील दास हे मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह एका विहिरीमध्ये सापडला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. ईडीने असीम दास याला ५ कोटी रुपयांसह पकडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील दास हे एका खासगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड होते. ते रविवारपासून बेपत्ता होते. महादेव ॲप प्रकरणामध्ये मुलाला अटक करण्यात आल्यानंतर ते काहीसे अस्वस्थ होते, असं सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्येची घटना दिसत आहे. मात्र मृत्यूच्यामागचं निश्चित कारण अध्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. तसेच तपास सुरू केला आहे.
ईडीने ३ नोव्हेंबर रोजी असीम दास आणि कॉन्स्टेबल भीम सिंह यादव यांना अटक केली होती. फॉरेन्सिक विश्लेषण आणि असीम दास यांच्या विधानामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महादेव सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मावळते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना तब्बल ५०८ कोटी रुपये दिले होते, असा दावा करण्यात आला होता. मात्र भूपेश बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.