केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव सांगितला. नेताजींचं देशप्रेम सांगताना इंग्रजांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या भितीची आठवणही करुन दिली. युवत्सव २०२३ या कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना नेताजींच्या बलिदानाची महती सांगितली. नेताजींनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यांची लढाई लढण्यासाठी आपली प्रशासकीय सेवेतील आयएएससारखी आयसीएसची नोकरी सोडून दिली होती.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांचा विरोध करत ते एकटे उभे राहिले होते. इंग्रज म्हणायचे की, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अनेक इंग्रज घाबरत होते. बंगालच्या धरतीवरून खुदीराम बोस यांनीही स्वातंत्र्याचा लढा दिला, येथील भूमीने अनेक स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले, म्हणूनच इंग्रजांनाही दिल्लीला जावे लागले, असा इतिहासही ठाकूर यांनी सांगितला. सध्या ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
देशात सध्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांविरुद्ध युवकांनी लढा दिला पाहिजे. तरुणाईने पुढे येऊन अशा लोकांचा विरोध केला पाहिजे, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले. दरम्यान, देशात आज सुभाष चंद्र बोस यांची १२६ वी जयंती साजरी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचा योगदान महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला.