आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण मुलांना काय शिकवतोय? रस्ता कसा ओलांडावा, वाहन आले तर काय करावे, विजेचे स्विच चालू बंद करताना काय करावे, काहीच नाही.... मुले आपोआप शिकतायत... नव्हे त्यांना शिकवले जातेय. अनेक पालक आज एक सतत तक्रार करत असतात, मुल मोबाईल, टीव्हीवर सारखे कार्टून पाहत असते. पण ही कार्टून मुलांना कसे वागायचे, बोलायचे प्रसंगी काय करायेच हे शिकवतेय. अशाच एक प्रसिद्ध कार्टूनच्या पात्राने एका सहा वर्षांच्या मुलाचा जीव वाचविला आहे.
लखनऊमध्ये बुधवारी एक इमारत कोसळली. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला तर १४ जणांना वाचविण्यात आले. यामध्ये ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला त्या या वाचलेल्या मुलाची आई आणि आजी आहेत. सपाचे प्रवक्ते अब्बास हैदर यांची आई आणि पत्नीचा मृत्यू झाला तर त्यांचा सहा वर्षांचा मुलगा वाचला आहे. त्याच्यावर एसपीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मुस्तफाने त्याचे प्राण एका कार्टुनमुळे वाचल्याचे सांगितले आणि सर्वांना आश्चर्य वाटले होते. मुस्तफा म्हणाला, 'जेव्हा बिल्डिंग हलत होती, तेव्हा तो पलंगाखाली लपला होता.' त्याने सांगितले की तो एक कार्टून पाहत असे, ज्यात भूकंपाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये हे समजावून सांगितले गेले होते, इमारत हादरत आहे असे वाटताच त्याला ते आठवले आणि तो पलंगाखाली लपला.
पलंगाखाली लपताना आईला धावताना पाहिले आणि संपूर्ण इमारत कोसळली आणि सर्वत्र अंधार पसरला. त्यानंतर काय झाले ते आठवत नाहीय. काही अनोळखी लोक मला घेऊन जात होते, असे तो म्हणाला.