देशभरात महागाई वेगाने वाढत असताना सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता दैनंदिन वापरातील साबण, शॅम्पू आणि टुथपेस्ट महाग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रिन, लक्स, लाइफबॉय, फेअर अँड लव्हलीच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील दिग्गज एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड लवकरच आपल्या प्रॉडक्टच्या किमतींमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
कंपनीकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हिंदुस्थान यूनिलिव्हर पीएलसीने रॉयल्टीमध्ये ८० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. एचयूएलमध्ये १० वर्षांमध्ये पहिल्यांदाच रॉयल्टी फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अखेरची वाढ ही २०१३ मध्ये करण्यात आली होती.
एचयूएलने माहिती देताना सांगितले की, नव्या करारानुसार रॉयल्टी आणि सेंट्रल सर्व्हिसेस फी वाढवून ३.४५ टक्के केली जाऊ शकते. तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये ती २.६५ टक्के एवढी होती. रॉयल्टी फीमधील ८० बेसिस पॉईंटच्या वाढीला ३ टप्प्यांमध्ये लागू केले जाऊ शकते.
सध्या महागाई झेलत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत आहे. सध्या कंपनी दररोजच्या सामानाच्या किमतीमध्ये वाढ करू शकते. देशातील प्रसिद्ध कंपनी सध्या पर्सनल केअरशिवाय, फूड, होम केअर, वॉटर प्युरिफायरसारखे अनेक प्रॉडक्ट बनवत आहे. त्याशिवाय मीठ, पीठ, कॉफी, चहा, केचअप, ज्युस, आइसक्रिम, व्हील, रिन, सर्फ डव्ह, शेव्हिंग क्रिमसह सर्व प्रॉडक्टचा समावेश आहे.
कंपनीच्या महसुलाचा विचार केल्यास गेल्या आर्थिक वर्षामध्ये तो ५१ हजार १९३ कोटी रुपये होता. तो एक वर्षाआधीच्या तुलनेत ११.३ टक्के अधिक होता. त्यामध्ये कंपनीने आपल्या पॅरेंट्स कंपनीला २,६५ टक्के रॉयल्टी दिली होती. आता यामध्ये वाढ झाल्यानंतर कंपनीला अधिक पैसे मोजावे लागतील.