मोरबी : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. त्यातील ६० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यामध्ये १० बालकांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ५० पेक्षा अधिक जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तत्काळ बचावकार्य हाती घेतले. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्या राज्यात इतकी मोठी दुर्घटना घडली आहे. निवडणूक प्रचारामध्ये मोरबी पुलाची दुर्घटना महत्त्वाचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.
मोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले. या दुर्घटनेतील नेमके किती लोक मरण पावले किंवा किती लोकांचा जीव वाचविण्यात आला याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.
१४० वर्षे जुना केबल पूल
मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते.
ओरेवा ग्रुपकडे होती देखभालीची जबाबदारी
मच्छू नदीवरील या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुपकडे सोपविण्यात आली होती. त्यासंदर्भात ही कंपनी व मोरबी नगरपालिकेमध्ये एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीने मार्च २०२२ ते मार्च २०३७ या १५ वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असे या कराराद्वारे ठरविण्यात आले होते. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणे अशी अनेक कामे ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती. मोरबी येथील केबल पूल कोसळण्याच्या घटनेस भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या पुलाच्या केलेल्या दुरुस्तीकामाची नीट पाहणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
मृतांच्या वारसदारांना केंद्र, गुजरात सरकार देणार आर्थिक मदत
मोरबी येथे केबल पूल नदीत कोसळल्याच्या घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपये व जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच मोरबी पूल कोसळण्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली.पूल कोसळून झालेल्या हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.