लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आकाशातून अक्षरशः आग ओकणाऱ्या सूर्याने मंगळवारी राजधानी दिल्लीत ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. तीव्र उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या दिल्लीत आज नरेला आणि मुंगेशपूर भागात ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे दिल्लीतील तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल ९ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तर व मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राजस्थानच्या चुरू व हरयाणातील सिरसामध्ये पारा ५० च्या पुढे गेला. दुसरीकडे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात नवतपामुळे अनेक जिल्ह्यात पारा ४० च्या पुढे गेला आहे.
दिल्लीत सोमवारी याच भागात ४८.८ अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम नोंदविला गेला होता, पण २४ तासांच्या आतच तो मोडीत निघाला. मुंगेशपूर आणि नरेला येथे प्रत्येकी ४९.९ अंश, नजफगढ येथे ४९.८ अंश, जाफराबाद येथे ४८.६ अंश पितमपुरा आणि पुसा येथे ४८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राजधानीत अन्य भागांमध्येही तापमान ४५ ते ४७ अंशांदरम्यान नोंदविले गेले.
केरळमध्ये जोरदार पाऊस
केरळच्या अनेक भागात मंगळवारी जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस झाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोचीतील रस्ते पाण्याखाली गेले. कोल्लम, कोट्टायम आणि एर्नाकुलम या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांना संततधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
काॅंक्रिटीकरणामुळे रात्रीही वाढला असह्य उकाडा
नवी दिल्ली : सिमेंटचे रस्ते तसेच बेसुमार कॉंक्रिटीकरणामुळे व वाढत्या नागरीकरणामुळे देशातील सुमारे १४० शहरांमध्ये रात्रीच्या वेळी ६० टक्के जास्त उकाडा जाणवत असल्याचे आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. शहरांत सिमेंटचे रस्ते दिवसभर तापतात आणि सायंकाळनंतर त्यातून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे रात्री उकाडा जाणवत असल्याचे म्हटले आहे.
ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तापमानवाढ
- शहरांतील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.५३ अंश सेल्सिअस
- ग्रामीण भागातील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.२६ अंश सेल्सिअस