नवी दिल्ली - नवं सिमकार्ड घेण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला काय करावं लागतं? आपण कुठल्याही स्टोअरवर जातो आणि ओखळपत्र दाखवल्यावर आपल्याला सिमकार्ड दिलं जातं. तसंच ते सिमकार्ड पुढच्या काही तासांतच अॅक्टिव्हेटही होतं. मात्र आता असं होणार नाही. कारण सरकारने सिमशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. काही ग्राहकांसाठी सिमकार्ड खरेदी करणं आता पहिल्यापेक्षा अधिक सोपं होणार आहे. तर काही लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आता ग्राहक नव्या सिमसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर ते सिम घरी डिलिव्हर केलं जाईल. आता कंपनी सिमकार्ड १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या देणार नाही. १८ वर्षांवर वय असलेले ग्राहक आधार किंवा डिजिलॉकरमध्ये स्टोअर असलेल्या कुठल्याही डॉक्युमेंटसह आपल्या नव्या सिमसाठी स्वत:ला व्हेरिफाय करू शकतो.
त्याशिवाय जर कुठलीही व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असेल तर त्यालासुद्धा नवे सिमकार्ड दिले जाणार नाही. जर अशी कुणी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताना पकडली गेली तर सिम विकणाऱ्या दूरसंचार कंपनीला दोषी मानले जाईल.
नव्या नियमांनुसार युझर्सना नव्या मोबाईल कनेक्शनसाठी UIDAI च्या आधार बेस्ड ई-केवायसी सर्व्हिसच्या माध्यमातून सर्टिफिकेशनसाठी केवळ १ रुपयांचा भरणा करावा लागेल.
DoTने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना मोबाईल कनेक्शन अॅप,पोर्टल बेस्ड प्रोसेसच्या माध्यमातून दिले जाईल. ज्यामध्ये ग्राहक घरबसल्या मोबाईल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात. दूरसंचार विभागाने उचललेलं हे पाऊल १५ सप्टेंबर रोजी कॅबिनेटद्वारे अनुमोदित दुरसंचार सुधारणांचा भाग आहे.