- एस. पी. सिन्हापाटणा : देशाचा विकास करण्याऐवजी केंद्र सरकार केवळ स्वप्रसिद्धी करण्यात गुंग आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या उपस्थितीत पाटणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या आमच्या मागणीकडे केंद्राने दुर्लक्ष केले, असा आरोप नितीशकुमार यांनी केला.
नितीशकुमार म्हणाले की, के. चंद्रशेखर राव यांनी अनेक उत्तम कामे केली आहेत. पण तरीही त्यांच्यावर काही जण टीका करत असतात. टीकाकारांचे हे वर्तन अनाकलनीय आहे. अलीकडेच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनचे नवे सरकार स्थापन झाले. विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने त्यांचा बिहार दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.|
शहीद जवानांच्या वारसदारांना तेलंगणाकडून आर्थिक मदतलडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात बिहारचे मूळ रहिवासी असलेले पाच जवान शहीद झाले होते. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये तसेच हैदराबाद येथील आगीच्या घटनेत बिहारचे १२ मजूर मरण पावले होते, त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तेलंगणा सरकारने देऊ केली आहे. पाटणा येथील कार्यक्रमात त्या रकमेचे धनादेश केसीआर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले.