नवी दिल्ली - केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेतील आपली भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्र्स्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून अॅक्सिस बँकेमधील १.५५ टक्के भागीदारी विकण्याची योजना आहे. म्हणजेच ४.६५ कोटी शेअर विकण्याचा सरकारचा विचार आहे. शेअर बाजारांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
या विक्रीसह सरकार खासगी क्षेत्रातील या बँकेमधून आपली संपूर्ण भागीदारी काढून घेणार आहे. एसयूयूटीआयकडे सप्टेंबर २०२२ पर्यंत अॅक्सिस बँकेमध्ये १.५५ टक्के भागीदारी असलेले ४,६५,३४,९०३ शेअर होते. केंद्र सरकारला बाजार भावानुसार अॅक्सिस बँकेच्या शेअरच्या विक्रीमधून सुमारे ४००० हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने गतवर्षी मे महिन्यामध्ये एसयूयूटीआयच्या माध्यमातून अॅक्सिस बँकेमधील आपली १.९५ टक्के भागीदारी सुमारे ४ हजार कोटी रुपयांना विकली होती. आता सरकार १०-११ नोव्हेंबर रोजी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ८३०.६३ रुपये प्रति शेअरच्या किमान मूल्यामध्ये ४६.५ दशलक्ष शेअरची विक्री करणार आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ही ऑफर आजपासून सुरू होईल. तर किरकोळ गुंतवणुकदार हे दुसऱ्या दिवसापासून बोली लावू शकतील.
खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने सप्टेंबर २०२२च्या तिमाहीमध्ये अंदाजापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. बँकेचा नफा तब्बल ७० टक्क्यांनी वाढून ५ हजार ३३० पर्यंत पोहोचला आहे. तर व्याजामधून मिळणारं उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून १० हजार ३६० कोटी रुपये झाले आहे. निव्वळ व्याजातील फरक हा ३.९६ टक्के एवढा राहिला आहे.