नवी दिल्ली - एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले.
मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारून महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. काहींनी प्रार्थना करून तर काहींनी त्यांच्या समर्थकांच्या घोषणाबाजीत पदभार स्वीकारला. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. २०१९ पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शाह यांनी शहरातील चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलिस स्मारकाला भेट दिली आणि देशसेवा करताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागात समृद्धी आणण्याचे काम करू. आम्ही केवळ पुण्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हवाई सेवा विस्तारित करू. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण करणे बाकी आहे. -मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री
सरकार योग आणि आयुर्वेदाचा जगभरात प्रचार करणार आहे. आता जगभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करणे, हे सरकारचे काम आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती मजबूत असून, विधानसभेत नक्कीच विजयी होईल.-प्रताप जाधव, आयुष आणि आरोग्य मंत्री
नवीन सरकार भारताच्या सुरक्षेसाठी आपले प्रयत्न पुढील स्तरावर नेईल आणि भारताला दहशतवाद, अतिरेकी आणि नक्षलवादाच्या विरोधात मजबूत बालेकिल्ला म्हणून विकसित करील. -अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री‘इंडिया फर्स्ट’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय परराष्ट्र धोरणाची दोन मार्गदर्शक तत्त्वे असतील. चीनबरोबर काही सीमावादाच्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.-एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्रीजागतिक आणि स्थानिक पातळीवर दूरसंचार क्षेत्र, भारतीय टपाल विभाग या दोघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मी अनेक वर्षांपूर्वी २००७, २००८ आणि २००९ मध्ये या विभागात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले. त्यामुळे माझ्यासाठी या विभागाशी माझे खूप भावनिक नाते आहे.-ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय दळणवळणमंत्रीसंसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. संख्याबळाच्या जोरावर एकमेकांना खाली पाडण्याची गरज नाही. संसदेबाहेर लोक बाहुबलाचा वापर करतात; पण सभागृहात आपण चांगल्या चर्चेसाठी भाषणाचा वापर केला पाहिजे.-किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री