नवी दिल्ली : देशात रोज ५० किलोमीटरपेक्षा जास्त महामार्ग बांधणीचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘या महिन्यात महामार्ग बांधणीचा स्वत:चाच जागतिक विक्रम सरकार मागे टाकेल.’
मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे नुकत्याच ५ राज्यांत झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला लाभ झाल्याचे दिसले, असे गडकरी म्हणाले. मंत्रालयाने रोज ३८ किलोमीटर महामार्ग बांधणीच्या विक्रमासह आधीच ३ विक्रम स्थापन केलेले आहेत, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, ‘आता आम्हाला रोज ५० किलोमीटर महामार्ग बांधणी करण्याची इच्छा आहे. मार्च, २०२२ अखेरपर्यंत मागच्या वर्षीच्या विक्रमाला मागे टाकायचे आहे.
भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे.’ भारतात लवकरच ग्रीन हायड्रोजन कार धावणार असून स्वयंचलित वाहनांचे उत्पादक सहा महिन्यांत देशातील गरजांच्या पूर्ततेसाठी फ्लेक्झिबल फ्युएल वाहने निर्मिती करण्यास बांधील आहेत, असेही गडकरी म्हणाले.
यापूर्वी भारतीय राजकारणावर जात, गुन्हेगार आणि रोख यांचा प्रभाव होता; परंतु या निवडणुकीने हे दाखवून दिले की लोक विकासासाठी मत देत आहेत. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांनी ६ महिन्यांत आवश्यक ते बदल आम्ही करून घेऊ, असे आश्वासन मला दिले आहे.-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री