कटक : ओडिशामधील कटक येथे भारतीय जनता पक्षाचे भर्तृहरी महताब आणि बिजू जनता दलाचे संतृप्त मिश्रा यांच्यामध्ये लढत होत आहे. भर्तृहरी महताब आतापर्यंत बीजेडीकडून सहा वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. मात्र, या वेळी ते भाजपकडून उभे आहेत. संतृप्त मिश्रा ओडिशामधील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. ४६१ कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे.
महताब यांना बीजेडीकडून तिकीट नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी पक्षत्याग केला आणि भाजपची वाट धरली. काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश महापात्र यांना उमेदवारी दिली आहे.
खरी लढत भाजप-बीजेडीमध्येच आहे. आपल्या करिष्म्याच्या बळावर भर्तृहरी यंदा निवडून येणार का, की बीजेडीचे पारडे वरचढ राहणार, हे चार जूनलाच कळेल.
निवडणुकीतील कळीचे मुद्देनागरी समस्या हा निवडणुुकीतील कळीचा मुद्दा राहिलेला आहे. जागोजागी खड्डे आणि इतर विकासाचे मुद्दे चर्चेला आहेत.आपणच विकासाची कामे केली, असे दावे उमेदवार करीत असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना समस्या भेडसावत आहेत.प्रचारात मात्र समस्यांची मांडणी कमी आणि भावनिक आवाहने होत आहेत. भर्तृहरी आणि संतृप्त मिश्रा यांच्यात नागरिक कुणाला पसंत करतात, याकडे लक्ष आहे.