भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून दुपारी २ वाजून ३५ मिटांनी चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले. चंद्रयान-३ हे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तसेच २३-२४ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत. जपान, ब्रिटनसह चीनच्याही अंतराळ संस्थेने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
जपानच्या अंतराळ संस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, भारताला चंद्रयानाचा यशस्वीरीत्या लॉंचिंगसाठी शुभेच्छा. तर ब्रिटनच्या अंतराळ संस्थेनेही भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, डेस्टिनेशन मून... चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी ISRO ला खूप खूप शुभेच्छा.
सर्वात उल्लेखनीय म्हणजे चीननेही चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारताचं कौतुक केलं आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने ट्विट करून दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ग्लोबल टाइम्सने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, अभिनंदन! तुम्ही चंद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. आता हे यान ऑगस्ट महिन्यात चंद्रावर यशस्वीरीत्या उतरण्याचा प्रयत्न करेल. भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं तर चंद्रावर नियंत्रित लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल. दरम्यान, चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर चीनच्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.