बंगळुरू - पोक्सो कायद्यान्वये नोंदविलेल्या एका गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना बंगळुरू न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. १७ वर्षे वयाच्या मुलीचा येडीयुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या आईने केली होती. त्या प्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) येडीयुरप्पांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे अशी नोटीस गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बी. एस. येडीयुरप्पा यांना बजावली आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांना अटकही करण्यात येईल असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी सांगितले. या प्रकरणी शनिवारी, १५ जून रोजी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी येडीयुरप्पा यांचा जबाब नोंदविणे आवश्यक आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य असलेले बी. एस. येडीयुरप्पा सध्या दिल्लीत आहेत. ते तिथून बंगळुरूला आल्यानंतर चौकशीला सामोरे जातील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.