कोलकाता - निवडणुकांची घोषणा होताच, नेतेमंडळी सर्वसामान्य नागरिकांशी जवळीक साधतात. जनतेच्या दरबारात जाऊन आगामी निवडणुकांसाठी आपल्याच पक्षाला समर्थन करण्यासाठी नेत्यांची लगबग दिसून येते. सर्वच राजकीय पक्षांची, पक्षातील नेत्यांची तीच कार्यपद्धती निवडणुकांच्या दोन महिन्यांच्या काळात दिसून येते. मग, एखादा बडा नेता चहाच्या दुकानात जाऊन चहा पितो, रस्त्यावरच वडापाव खातो किंवा एखाद्या लहान सलूनमध्ये जाऊन दाढी करून घेतो, असे अनेक किस्से निवडणूक काळात दिसून येतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क चहाच्या टपरीवर जाऊन स्वत: चहा बनवला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे काही फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. त्यामध्ये, त्यांनी एका छोट्याशा चहाच्या टपरीवर जाऊन स्वत:च्या हाताने चहा बनवला. त्यानंतर, किटलीतून कपातही ओतल्याचं फोटोतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे. मात्र, विरोधकांकडून ही केवळ स्टंटबाजी असल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे. निवडणुकांच्या तोंडावर गरिबांसोबत असल्याचं दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं भाजपा समर्थकांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी गतवर्षी पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळीही अशाच प्रकारे एका चहाच्या दुकानात जाऊन चहा बनवला होता. कूचबिहारच्या चंदामारी येथील सभेनंतर ममता यांनी नागरकोटा येथील रस्त्यावर असलेल्या लहानशा चहाच्या टपरीत जाऊन चहा बनवला आणि स्वत:ही प्यायला होता. आता, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जींनी एका लहान चहा टपरीवर जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचं त्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून सांगितलं आहे. त्यामुळे, भाजपाने चहा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला होता. चाय पे चर्चा म्हणत भाजपाने मोठे कॅम्पेनही देशभर राबवले होते. त्यामुळे, आता ममता बॅनर्जींनी चहा बनवून स्वत: देऊ केल्याने विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. सोशल मीडियावरही मुख्यमंत्र्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.