लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते व इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले. पित्रोदांचे हे उद्गार वर्णद्वेषी असून त्यामुळे काँग्रेसच्या लोकांमध्ये फूट पाडण्याची भूमिका उघड झाल्याची टीका भाजपने केली. कॉंग्रेसने पित्रोदांच्या वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले, आम्ही गेली ७५ वर्षे सलोख्याच्या वातावरणात अतिशय आनंदाने राहात होतो. छोट-मोठे वाद झाले, पण तेही आम्ही बाजूला ठेवले. भारतासारखा देश एकसंध ठेवण्याचे काम आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो. पूर्वेकडील लोक चिनींसारखे दिसतात, दक्षिणेतील लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरब तर उत्तर भारतातील नागरिक श्वेतवर्णीय लोकांसारखे दिसतात. मात्र त्याने काही फरक पडत नाही. हे सारे लोक आमचे बंधू व भगिनी आहेत. आम्ही विविध भाषा, धर्म, चालीरीती, आहारातील वैविध्य या गोष्टींचा आदर करतो.
भारतातील वैविध्याचे वर्णन करताना पित्रोदा यांनी जे शब्द वापरले ते दुर्दैवी असून आम्हाला ते मान्य नाहीत. पित्रोदांच्या या भूमिकेला कॉंग्रेस पक्ष पाठिंबा देत नाही. सॅम पित्रोदा यांची वक्तव्ये ही काँग्रेसची भूमिका नाही. - जयराम रमेश, महासचिव, कॉंग्रेस
सॅम पित्रोदा यांनी काढलेले वर्णद्वेषी उद्गार भारतीयांनी अजिबात खपवून घेऊ नयेत. द्रौपदी मुर्मू या सावळ्या वर्णाच्या असल्यामुळेच त्यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा होती.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अखेर पदाचा राजीनामा nइंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतातील नागरिकांबद्दल त्यांनी काढलेल्या वादग्रस्त उद्गारांमुळे काँग्रेस वर्णद्वेषी आहे असा भाजपने आरोप केला होता. nया प्रकरणानंतर त्यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी स्वीकारला. ही घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून केली. पित्रोदा यांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.