गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोईसुविधांसोबत आरोग्यविमाही काढून देतात, परंतु आजही तब्बल ८३ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने आपला आरोग्य विमा काढला आहे, हेच ठाऊक नसते. हेल्थटेक कंपनी ऑनश्योरिटीने देशभर केलेल्या पाहणीत ही गंभीर बाब समोर आली आहे.
८३% जणांना त्यांच्या कंपनीनेच आरोग्य विमा काढल्याचे ठाऊक नाही!
पाहणीत कुणाचा सहभाग? कंपनीने दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, तसेच चंडीगड आदी शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल १,१५० कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली.
हे झाले उघड...६०% लोकांना हेच माहीत नव्हते की, कंपनीने त्यांच्यासाठी नेमका कोणत्या कंपनीकडून विमा काढला आहे. १० पैकी ९ जणांकडे कंपनीने काढलेला आरोग्यविमा होता, परंतु यातील २ जणांना त्याची रक्कम ठाऊक नव्हती. १० पैकी केवळ एकानेच आरोग्यविम्यासाठी दावा दाखल केला आहे. ८३ टक्के जणांना आरोग्य विम्यामध्ये वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, याची माहिती नाही. ७१% जणांना आरोग्यविमा पॉलिसीच्या लाभधारकांमध्ये आई-वडिलांनाही समावेश आहे, याची कल्पना नव्हती.
लाखोंच्या बिलांमुळे खिसा रिकामा ८४% जणांनी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्या वेळीच केल्या असत्या, तर गंभीर आजार होण्याची जोखीम वाढली नसती.
१६% जणांनी आरोग्य विम्याची नीट माहिती न घेता, उपचारांवर प्रचंड पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांना आता आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.
५ टक्के कंपन्याच देताच सर्वंकष विमा गेल्या काही दिवसांत देशात आरोग्य विम्याविषयी जागृती वाढली आहे. याबाबत माहिती घेण्यास लोक उत्सुक असतात. आजही देशातील केवळ ५ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष विमा काढतात. यात आरोग्य विमा, अपघात किंवा अपंगत्व विमा, टर्म लाइफ इन्शुरन्स आदींचा समावेश.