गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत १४१ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पुलावर दुर्घटनेच्यावेळी ५०० हून अधिक होते, ते सर्वचजण नदीच्या पात्रात पडले होते. या पुलाच्या दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट ओरेवा कंपनीला देण्यात आलं होतं. पण, आता या कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. विशेष म्हणजे २ वर्षांपूर्वीच या घटनेची स्क्रीप्ट लिहिण्यात आली होती, पण बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली.
पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेखला (Deepak Parekh) अटक झाली. या ओरेवा कंपनीचे जानेवारी २०२० मधील एक लेटर समोर आले आहे. मोरबी जिल्हाधिकारी यांना हे पत्र लिहिण्यात आले होते. त्यामध्ये, पूल दुरुस्तीसाठी खोलण्यात यावा, तो दुरूस्त करण्यात येईल, असे लिहिले होते. मात्र, या पत्रावर अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
या पत्रानुसार पुलाचा ठेका दिलेल्या कंपनीत आणि प्रशासनात मोठा वाद सुरू होता. ओरेवा ग्रुपकडून पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कायमचे कामकाज मागण्यात येत होते. मात्र, जोपर्यंत स्थायी कंत्राट दिले जात नाही, तोपर्यंत कंपनीला अस्थायी कामकाज करावे लागणार आहे. मात्र, यामध्ये पुलाच्या दुरुस्तीसाठी ओरेवा कंपनी सामनाची ऑर्डर देणार नाही. तसेच, मागणी पूर्ण झाल्यानंतरच काम सुरू करेल. अखेर निष्काळजीपणानंतर ओरेवा ग्रुपला स्थायी म्हणजे कायमचं कंत्राट देण्यात आलं. २०२० मध्ये जारी केलेल्या या पत्रानुसार १५ वर्षांसाठी कंपनीला पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मार्च २०२२ मध्ये मोरबी नगर निगम आणि अजंता ओरेवा कंपनीत करारावर हस्ताक्षर झाले. त्यानुसार, हे काम २०३७ पर्यंत कंपनीकडे देण्यात आले होते.
दरम्यान, मोरबी नगर पालिकेचे अधिकारी संदीप सिंह यांनी म्हटले की, ओरेवा कंपनीने नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. नगरपालिकेला कुठलीही पूर्वसूचना न देता, कंपनीने ५ महिन्यांतच पुल खोलला होता. विशेष म्हणजे पुलासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने कुठलेही प्रमाणपत्र जारी केले नव्हते.
स्मशानभूमीत रांग,
भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. शहरातील चार कब्रस्तान आणि सातही स्मशानांत असंच चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांकडे सोपवले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गर्दी झाली होती. शहरातल्या 4 कब्रस्तानमध्ये कबर खोदण्यासाठी वेळ लागत आहे.
आत्तापर्यंत ९ जणांना अटक
पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेखला (Deepak Parekh) अटक झाली. कोर्टासमोर त्याने आता एक अजब आणि संतापजनक विधान केलं आहे. "देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली" असं दीपक पारेख याने म्हटलं आहे. "कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते खालच्या स्तरावरील कर्मचार्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. पण अशी दुर्दैवी घटना घडली हीच देवाची इच्छा होती" असं त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.