चंडीगड : एका बदनामीच्या खटल्यामध्ये लुधियाना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साक्षीदार म्हणून हजर राहण्यास पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिद्धू यांना पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने परवानगी दिली. या खटल्यात सिद्धू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था असून, त्यांनी पतियाळाहून येऊन लुधियाना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवावी, अशी मागणी असेल तर त्यांच्या सुरक्षेवर होणारा खर्च सरकारने नव्हे तर तक्रारदाराने करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
एका गुन्ह्यात नवज्योत सिद्धू पतियाळा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. काँग्रेसमधील सिद्धू यांचे सहकारी व माजी मंत्री भारतभूषण आशू यांच्यावर बडतर्फ केलेले डीएसपी बलविंदर सिंग शेखाँ यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्या प्रकरणात सिद्धू यांनी साक्षीदार म्हणून लुधियाना न्यायालयात उपस्थित राहावे, असा समन्स त्यांना जारी झाला आहे. मला झेड प्लस सुरक्षाव्यवस्था असून, लुधियाना न्यायालयात प्रत्यक्षरीत्या हजर राहिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी याचिका सिद्धू यांनी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाकडे केली होती. (वृत्तसंस्था)
बदनामीचे प्रकरण खासगी स्वरूपाचे-
पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचे न्या. अरुण मोंगा यांनी असा आदेश दिला की, बदनामीचे प्रकरण हे खासगी स्वरूपाचे असून, त्यासाठी साक्षीदार म्हणून बोलाविले. नवज्योत सिद्धू यांच्या सुरक्षेवरील खर्च सरकारने करण्याची आवश्यकता नाही.