- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक बोलावली आहे. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी कार्यकारिणीची बैठक होणार असून १७ सप्टेंबर रोजी विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये कार्यकारिणीच्या सदस्यांव्यतिरिक्त सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही सहभागी होणार आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हैदराबादजवळच एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर १८ सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्ते तेलंगणातील बीआरएस सरकारच्या विरोधात घरोघरी जाऊन मोहीम सुरू करणार आहेत. काँग्रेसच्या धोरणांचा प्रचार करण्याच्या सूचना सर्व नेत्यांना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने प्रदीर्घ काळानंतर आपली निवडणूक रणनीती बदलली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पाच हमी योजनांची घोषणा करणारतेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या मेळाव्यात कर्नाटकच्या धर्तीवर काँग्रेस पाच हमी योजनांची घोषणा करणार आहे. तेलंगणातील सर्व ११९ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही प्रचार करणार आहेत.