यदु जोशी -
लुधियाना : काँग्रेस पक्षाने आज मला मोठा सन्मान दिला, आता तो सर्वांना सोबत घेऊन सार्थ करणारच. आम्ही दोन तृतीयांश जागा जिंकणारच, पुढचे सरकारदेखील आमचेच, या शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर होताच व्यक्त केला. मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच तासाभरात पहिली विशेष मुलाखत त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
चन्नी यांनी महान संत रविदास यांच्या भजनातील काही ओळी म्हटल्या. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते अतिशय भावुक झाले.
दलित समाजातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला काँग्रेसने एकदा मुख्यमंत्री केले अन् आज पुन्हा विश्वास व्यक्त केला असे म्हणत त्यांनी महान संत रविदास यांच्या भजनातील काही ओळी उदृत केल्या. ‘ऐसी लाल तुझ बिन कउनु करै, गरीब निवाजु गुसाईआ मेरा माथै छत्रु धरै, नीच उच करै मेरा गोबिंदु काहू ते न डरै‘, असे म्हणत त्यांनी ईश्वर अन् ईश्वरासारखी कृपा करणाऱ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.आपल्यालाच पुढची संधी दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नाराजीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही का?- अजिबात नाही. सिद्धू माझे मित्र, सहकारी आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात; पण आपल्या मनात पंजाबच्या विकासाचा जो रोडमॅप आहे तो पूर्णत्वास काँग्रेसच नेऊ शकते, असे त्यांनी आजच्याच राहुलजींच्या सभेत सांगितले. त्यांच्यासह सर्वांच्याच विकासाचा रोडमॅप मला पुढे न्यायचा आहे. आपल्याला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार केल्याने काँग्रेस जिंकेल असे आपल्याला वाटते का?- मी तसे म्हणालो नाही. आजचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आहे आणि तो त्यांनी सगळ्यांच्या मनाचा कानोसा घेऊन केलेला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, हे उद्याचे चित्र मला आजच दिसत आहे. माझे नाव जाहीर झाल्यानंतर पंजाबभर दिवाळी साजरी होत असल्यासारखेच वातावरण आहे. उद्याच्या विजयाची ही नांदीच आहे. कोण आम आदमी? अहो! आम आदमी तर मीच आहे अन् आम आदमी पक्षासोबत आहे.
आपली लढत कोणाशी आहे, आपशी की भाजपशी?- समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या काँग्रेसच्या विचारांचा विरोध करणाऱ्या प्रत्येकच पक्षाशी आमचा लढा आहे आणि राहील. मला माझ्या पक्षाची रेष मोठी करायची आहे. काँग्रेस ही पंजाबची लाइफलाइन आहे. इतर सर्वच पक्षांनी इथल्या मतदारांची घोर निराशा केली आहे.