- त्रियुग नारायण तिवारीअयोध्या : येथील भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर १४ जानेवारी २०२४ रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. पुढील वर्षी या मंदिरात रामजन्मोत्सवाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रामलल्ला मंदिराचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी रामनवमीनिमित्त रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.
रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सध्या वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. तळमजल्यावर मंदिराचे खांब उभारण्यात आले असून, त्यावर तुळई (बीम) बसविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर छत बनविण्याचे काम सुरू होईल. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, बांधकाम नियोजित वेळेनुसार सुरू आहे आणि वेळेवर पूर्ण केले जाईल.
दर्शनाच्या वेळेत वाढ
रामनवमीनिमित्ताने रामलल्लाच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शनासाठी दोन्ही सत्रांत अर्ध्या तासाने वेळ वाढविण्यात आली आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी झाली आहे.
२० लाख भाविक येण्याची अपेक्षा
गुरुवारी रामनवमीनिमित्त सुमारे २० लाख भाविक शरयूत स्नान करतील आणि विविध मठ मंदिरांना भेट देतील, अशी अपेक्षा आहे. तात्पुरते राम जन्मभूमी मंदिर व कनक भवन येथे जयंती कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. १२ वाजता जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. कनक भवनात जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. रामनवमी पाहता अयाेध्या आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.