हैदराबाद : जगातील पहिले 3D प्रिंटेड हिंदू मंदिर तेलंगणामध्ये बांधले जात आहे. सिद्धीपेट येथील बुरुगुपल्लीमधील एक गेटेड व्हिला समुदाय चरविथा मीडोजमध्ये 3D प्रिंटेड मंदिर तयार करण्यात येत आहे. हे मंदिर शहरातील अप्सुजा इन्फ्राटेकद्वारे 3,800 चौरस फूट क्षेत्रफळावर बनवण्यात येणारं आहे.
अप्सुजा इन्फ्राटेकने या प्रकल्पासाठी थ्रीडी प्रिंटेड कन्स्ट्रक्शन कंपनी सिम्पलीफोर्ज क्रिएशन्सशी करार केला आहे. अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्ण जीडीपल्ली म्हणाले की, "या संरचनेत तीन गर्भगृहे आहेत : भगवान गणेशासाठी एक मोदक, भगवान शंकरासाठी एक शिवालय आणि देवी पार्वतीसाठी एक कमळाच्या आकाराचे मंदिर असणार आहे."
विशेष म्हणजे, हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने सिम्पलीफोर्ज क्रिएशन्सने मार्चमध्ये दोन तासांपेक्षा कमी कालावधीत भारतातील पहिला प्रोटोटाइप ब्रिज बांधला होता. दरम्यान, आयआयटी हैदराबादच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक केव्हीएल सुब्रमण्यम आणि त्यांच्या संशोधन समूहाने मंदिराची संकल्पना आणि डिझाइन विकसित केली आहे. यानंतर मंदिराभोवती असलेल्या बागेत पादचारी ब्रिज बांधण्यात आला.
दरम्यान, टीम आता देवी पार्वतीच्या कमळाच्या आकाराच्या मंदिरावर काम करत आहे. "शिवालय आणि मोदक पूर्ण झाल्यामुळे, दुसरा टप्पा कमळ आणि उंच शिखराचा (गोपुरम) समावेश आहे," असे अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्ण जीडीपल्ली म्हणाले.