NHAI latest news : सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले. वेगात असलेल्या गाड्या अचानक उसळताना दिसत आहेत. अनेकांनी हे व्हिडीओ शेअर करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे याकडे लक्ष वेधले. रस्त्याच्या कामात झालेल्या चुकांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या व्हिडीओची दखल घेत गडकरींनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आता इंजिनिअरला बडतर्फ करण्यात आले असून, कंत्राटदाराला लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात आली.
कंत्राटदाराला किती दंड करण्यात आला?
NHAI कडून सांगण्यात आले की, रस्त्याच्या कामात झालेल्या चुका दूर करण्यासाठी कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर कामावर व्यवस्थित देखरेख न ठेवल्याबद्दल आणि कामात कसूर केल्याबद्दल निवासी इंजिनिअरला बडतर्फ करण्यात आले आहे.
त्याचबरोबर साईटवर असलेल्या इंजिनिअरलाही निलंबित करण्यात आले आहे. कामाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
NHAI ने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी केली. हा व्हिडीओ दिल्ली वडोदरा एक्स्प्रेस वे वरील असल्याचे समोर आले. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग १२० किमी प्रतितास इतका असतो. या एक्स्प्रेस वे वर राजस्थानातील अलवर आणि दौसा या दरम्यान सर्वाधिक अपघात होतात. यामागे रस्ता खाली-वर आहे. त्याचबरोबर खड्डेही आहेत.