नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री संत्येंद्र जैन यांनी अजबच दावा केला आहे. कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ईडीने मनी लाँड्रींगची कारवाई केल्यानंतर काही दस्तावेज दाखवून त्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी, ईडीतील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जैन यांनी हा दावा केला आहे. जैन यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीने न्यायालयात ही आश्चर्यकारक माहिती दिली.
मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची मागणी केली होती. जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कोठडी वाढवून देण्याची गरज नसल्याचा दावा केला. आता, याप्रकरणी सत्येंद्र यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्त हरिहरन यांनी बाजू मांडली. तर, सरकारच्यावतीने एडिशनल सॉलिटर जनरल एसबी राजू यांनी जैन यांच्या जामिन याचिकेवर बाजू मांडली. त्यानंतर, न्या. गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.
कुमार विश्वास यांचं ट्विट
जैन यांची स्मरणशक्ती गेल्यासंदर्भात कधी काळी आम आदमी पक्षाचे नेते राहिलेल्या कुमार विश्वास यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये, भारतरत्न असं लिहिलं आहे. तर, मंत्री अनुराग ठाकूर यांनी टविट करुन, अद्यापही या मंत्र्यास मंत्रीमंडळात का ठेवले आहे, असा सवाल केला आहे.
‘त्या’ मुद्देमालाची चौकशी बाकी
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले, की दिल्ली आणि गुरुग्राम येथे ईडीने जैन यांच्या ७ ठिकाणांवर छापे मारले होते. त्यातून सुमारे २.८२ कोटी रोख व १.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. याबाबत जैन यांची चौकशी करायची असल्याने कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी राजू यांनी केली होती