भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांची देशाला आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी २०२५ मध्ये थोडं गंभीर झालं पाहिजे आणि बालिशपणा सोडला पाहिजे, असा खोचक टोला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लगावला आहे.
ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, देशाला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गरज आहे. राहुल गांधी यांनी अयोध्येत आलं पाहिजे. तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीराम आणि हनुमानजींचं दर्शन घेतललं पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सदबुद्धी मिळवावी आणि देशासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत. ते उपस्थित केले पाहिजेत. तसेच राहुल गांधी यांनी राजकारणात सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जनतेशी संबंधित असलेले मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरूनही ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. कांग्रेस नरसिंह राव यांचा अपमान विसरली. तेव्हा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात नेऊ दिलं नव्हतं. आपल्या कुटुंबीयांशिवाय इतर कुणाचंही स्मारक दिल्लीमध्ये बनू नये, अशी यांची इच्छा आहे, असा टोलाही ब्रिजभूषण सिंह यांनी लगावला.