नवी दिल्ली : अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा होऊ न देण्यासाठी पंतप्रधान सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले. या अब्जाधीश उद्योगपतीमागे कोणती शक्ती आहे हे देशाला कळले पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, विरोधी सदस्यांनी दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प पाडले.
‘संसदेत अदानीजींवर चर्चा होऊ न देण्यासाठी मोदीजी प्रयत्न करतील. यामागे एक कारण आहे. ‘अनेक वर्षांपासून मी सरकारबद्दल आणि ‘हम दो, हमारे दो’बद्दल बोलत आहे. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, असे सरकारला वाटत नाही. कारण ते घाबरले आहेत.
सरकारची आशा धुळीला -संसदेत नव्या आठवड्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात होण्याची सरकारची आशा सोमवारी धुळीला मिळाली. अदानी मुद्द्यावर विरोधक गदारोळ घालत आहेत. विरोधी पक्षाचे सदस्य ‘अदानी सरकार शेम-शेम’च्या घोषणा देत अध्यक्षांसमोरील हौद्यात आले. अदानी समूहाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना जागेवर जाऊन चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. अदानी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाजही सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
काँग्रेसची विविध राज्यांत निदर्शने -काँग्रेसच्या आदेशांवरून अदानीप्रकरणी विविध राज्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी निदर्शने केली. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानसह अनेक राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.