नवी दिल्ली : भारताची पहिली वंदे मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहे. अहमदाबाद ते भूज या दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेला सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अहमदाबाद ते भूज या दरम्यानचा ३३४ किमीचा प्रवास ही मेट्रो अवघ्या ५ तास ४५ मिनिटांत पूर्ण करणार आहे. शहरातील मेट्रोप्रमाणचे या रेल्वेची संरचना असली तरी जास्तीचे अंतर पार करण्यासाठी प्रथमच मेट्रोचा वापर होत आहे. प्रवाशांना जलद व अधिक आरामदायी प्रवास करता यावा, या उद्देशाने ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन सुरू केली आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन असून, ती प्रतितास १०० ते २५० किलोमीटर या वेगाने धावणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या मेट्रोत तीन-तीन बेंच-प्रकारची आसनव्यवस्था आहे. आरामदायी पद्धतीने प्रवास करता यावा, या उद्देशाने ही आसनव्यवस्था केली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी डब्यांमध्ये व्हीलचेअर-शौचालयाची व्यवस्था आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मेट्रोत टॉक-बॅक पद्धतीचा वापर केला आहे. टॉक-बॅक सुविधेमुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट चालकाशी संपर्क करता येणार आहे. या रेल्वेत १,१५० प्रवाशांची आसनव्यवस्था असून जवळपास २,०५८ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात.
हे आहेत नऊ थांबे
अंजार, गांधीधाम, भचाळ, समखियाली, हलवड, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया, साबरतमी या नऊ स्थानकांवर ही मेट्रो थांबेल.
ट्रेन किती वाजता सुटेल, कधी पोहोचणार?
वंदे मेट्रो ट्रेन पहाटे साडेपाचला भूज येथून निघाल्यानंतर सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी ती अहमदाबादमध्ये दाखल होईल.
यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता ही मेट्रो अहमदाबादवरून सुटल्यानंतर रात्री ११ वाजून १० मिनिटाला भूजमध्ये दाखल होईल.
आठवड्यातील सहा दिवस नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे. भुज-अहमदाबाद वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या मार्गावर एकून नऊ स्थानके आहेत. प्रत्येक स्थानकावर ही रेल्वे दोन मिनिटे थांबणार आहे.