आपला भारत देश सोडून अमेरिकेत जाण्यासाठी हजारो लोकांनी कित्येक पापड लाटले आहेत. अनेकांनी जमिन, जुमला विकून, लोकांकडून लाखोंचे कर्ज घेऊन डंकीच्या खडतर मार्गाने अमेरिका गाठली आहे. यापैकी काही शे लोक पकडले गेले आहेत, त्यांना अमेरिका बेड्या घालून माघारी पाठवत आहे. अशातच देशाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या देशद्रोही व्यक्तीचे प्रताप समोर आले आहेत.
गुजरातच्या एसी पटेल याने अमेरिकेत जाण्यासाठी पाकिस्तानी बनण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पटेलने पाकिस्तानच्या मोहम्मद नजीर हुसैन असल्याचे अमेरिकेला भासविले होते. पटेलकडे जो पासपोर्ट होताा तो हुसैन नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीचा होता. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या लगेचच ही बनवाबनवी लक्षात आली आणि या देशद्रोह्याचा बुरखा फाटला. अमेरिकेने त्या पटेलला भारतात पाठवून दिले आहे.
डोनाल्ड ट्र्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने अवैध प्रवाशांना हाकलून देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत १७ हजारहून अधिक भारतीय असे बेकायदा राहत असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने ७४ गुजराती नागरिकांसह शेकडो भारतीयांना परत पाठविले आहे. यात या पटेलचाही नंबर होता. परंतू, याला त्यांनी पंजाबला नाही तर दिल्लीला पाठवून दिले होते.
दिल्ली विमानतळावर उतरताच पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर फसवणूक, बनावटगिरी आणि पासपोर्टचा गैरवापर असे गंभीर आरोप लावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या पटेलकडे खरा पाकिस्तानी पासपोर्ट होता. हुसेन नावाच्या व्यक्तीचा हा पासपोर्ट होता, तो हरवला होता. दुबईतील एका एजंटला पैसे देऊन त्याने हा पासपोर्ट मिळविला होता. या पटेलचा पासपोर्ट २०१६ ला संपला होता. त्याने तो नवा बनविला नव्हता. ही मानवी तस्करी असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.