आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने सोमवारी चौकशी केली होती. यानंतर लगेचच बुधवारी त्यांना अटक करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने केजरीवाल यांचा जामीन रद्द केल्यानंतर लगेचच सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयचे वकील आणि केजरीवालांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. केजरीवाल यांनी दारु घोटाळ्याचा सारा दोष मनिष सिसोदियांवर ढकलल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. यावर केजरीवाल यांनी हा दावा फेटाळून लावला. या युक्तीवादानंतर कोर्टाने सायंकाळपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.
कोर्टाने केजरीवाल यांना तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठविले आहे. दुसरीकडे केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयाचा निर्णय रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती माघारी घेण्यात आली आहे. आता पक्ष नवीन याचिका दाखल करणार आहे.
केजरीवाल यांना 20 जूनला जामीन मिळाला होता. ईडीने तातडीने उच्च न्यायालयात जाऊन त्यावर बंदी आणली. दुसऱ्याच दिवशी सीबीआयने त्यांना अटक केली. एक व्यक्ती तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. ही हुकूमशाही आहे, ही आणीबाणी आहे, अशी टीका केजरीवाल यांची पत्नी सुनिता यांनी केली आहे.