मनोज मुळ्ये -
बिजनोर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश म्हटल्यानंतर सर्वात प्रथम आठवते ती इथली गुन्हेगारी. हिंदी चित्रपटातून, प्रसारमाध्यमांमधून वारंवार हे चित्र उभे राहिले आहे. मात्र आता त्यात बरेच बदल झाले आहेत. बिजनोर भागात गेल्या पाच वर्षांत गुन्हेगारीला लगाम लावल्यामुळे अनेक हिस्ट्रीशिटर्स गुन्हेगारी सोडून कामधंदा करू लागले आहेत.
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन महिने पोलीस हिस्ट्रीशिटर्सवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या घरी जाणे, अचानक तपासणी करणे असे पर्याय वापरले जात आहेत. बिजनोर भागात तब्बल ११५० हिस्ट्रीशिटर्स आहेत. त्या साऱ्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. मात्र आता या गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.
चांदपूर भागात अजमल नावाचा हिस्ट्रीशिटर कपडे शिवण्याचा व्यवसाय करत आहे. कोतवाली गावातील खुर्शीद नावाच्या हिस्ट्रीशिटरने भांड्याचे दुकान सुरू केले आहे. पोलिसांच्या या यादीतील ३१२ जण बेपत्ता आहेत. उर्वरित लोकांनी गुन्हेगारीची वाट सोडून मोलमजुरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. अर्थात या सर्वजणांवर पोलिसांनी आपली नजर कायम ठेवली आहे.
गुन्हेगारी कमी झाल्याचे होते मान्य...
गुन्हेगारी हा इथल्या प्रत्येक निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा मानला गेला आहे. चोरी, लुटमारीसोबतच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही उत्तर प्रदेशात अधिक होते. मात्र आता त्यात खूप मोठा फरक पडल्याचे सांगितले जात आहे. केवळ भाजपच नाही तर अन्य पक्षातील लोकही गुन्हेगारी कमी झाल्याची बाब मान्य करत आहेत.
- कौरव आणि पांडवांमध्ये सामंजस्य राहावे, शांतता राहावी, यासाठी सर्वाधिक प्रयत्न करणाऱ्या विदुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजनोर सध्या प्रचाराच्या रणधुमाळीने गजबजले आहे. पंतप्रधानांनी ऑनलाइन केलेले भाषण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा, यामुळे बिजनोर जिल्हा ढवळून निघाला आहे.
- -कौरव आणि पांडवांमध्ये शांततेत वाटाघाटी व्हाव्यात, यासाठी अथक प्रयत्न करूनही यश न मिळाल्यामुळे विदुर यांनी हस्तिनापूर साेडले आणि ते बिजनोरमध्ये येऊन थांबले.
- ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळी अनेक सरदार, सैनिकांनी विदुरांना विनंती केली की, त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलांना या आश्रमात ठेवावे, जेेणेकरून ती सुरक्षित राहतील.
- बिजनोरपासून १२ किलोमीटरच्या अंतरावरील हा भाग आता ‘विदुरकुटी’ म्हणून ओळखला जातो.
- दोन दिवसांपूर्वी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे ते आले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री योगी यांनी ही सभा घेतली.
- बिजनाेर जिल्ह्यात आठ मतदार संघांत दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १४ फेब्रुवारीला मतदान होत असल्याने, आता या भागाकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.
- या जिल्ह्यातील बढापूर भागात बुधवारी एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी सभा घेतली, तर गुरुवारी मुख्यमंत्री याेगी नगिना मतदार संघात सभा घेणार आहेत.