एक महाकाय लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. ही घटना 27 मे रोजी घडेल. महत्वाचे म्हणजे, हा लघुग्रह बुर्ज खलीफापेक्षा जवळपास दुप्पट मोठा, तर कुतूब मिनारपेक्षा तब्बल 24 पट मोठा असल्याचा दावा नासाच्या (NASA) सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजने (Center for Near Earth Object Studies - CNEOS) केला आहे.
खरे तर, या घटनेमुळे भयभीत होण्याची गरज नाही. या लघुग्रहाचे अथवा अॅस्टेरॉईडचे नाव 7335 (1989 JA) असे आहे. तो पृथ्वीपासून सुमारे, 40 लाख किलोमीटर दूर असेल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्रातील सरासरी अंतराच्या पेक्षा जवळपास 10 पट अधिक आहे.
मात्र, असे असले तरी, अॅस्टेरॉईडचा महाकाय आकार (1.8 किमी व्यास) आणि पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर पाहता, नासाने त्याला 'संभाव्य दृष्ट्या धोकादायक' श्रेणीत ठेवले आहे. अर्थात, या अॅस्टेरॉईडची कक्षा बदलली, तर तो आपल्या ग्रहाला मोठे नुकसान पोहोचवू शकतो.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, 7335 (1989 JA) हा पृथ्वीच्या जवळ येणारा सर्वात मोठा अॅस्टेरॉईड आहे. तसेच, हा अॅस्टेरॉईड जवळपास 76,000 किमी प्रति तास एढ्या वेगाने येत आहे. 23 जून, 2055 च्या आधी हा अॅस्टेरॉईड पृथ्वीच्या जवळ येणार नाही, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.