हैदराबाद: सायबराबाद पोलिसांनीसेक्स रॅकेटशी संबंधित 18 जणांना अटक केली आहे. मागील काही वर्षांपासून यांनी तब्बल 14,000 हजारांहून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात फसवले होते. सायबराबाद पोलिसांनी अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा (sex Racket) पर्दाफाश केला. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रमुख सूत्रधारांना बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील काही वर्षांत भारतातील 15 शहरांमध्ये 14,000 हून अधिक महिला आणि काही परदेशी नागरिकांवर लैंगिक अत्याचार केले. या टोळीकडून आरोपी महिलांचा अमली पदार्थ विक्रीसाठी देखील वापर केला जात होता. लक्षणीय बाब म्हणजे ही टोळी एवढी सक्रिय होती की त्यांनी ग्राहकांना आमिष दाखवण्यासाठी बंगळुरू आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे कॉल सेंटर सुरू केले होते.
सेक्स रॅकेटचा पर्दाफाशटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सायबराबाद आणि हैदराबादमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनमध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत 37 प्रकरणे नोंदवण्यात आली. या माध्यमातून पर्यटक व्हिसावर असलेल्या अर्धा डझन परदेशी लोकांसह 120 जणांची सुटका करण्यात आली. मुख्य आरोपींपैकी एक दररोज जवळपास 30,000 रुपये नफा कमवत होता. तर महिलांना कमाईच्या 30% रक्कम दिली जात होती. माहितीनुसार, या टोळीतील सुमारे 50% पीडित महिला पश्चिम बंगालमधील आहेत. या पाठोपाठ कर्नाटकातील 20%, महाराष्ट्रातील 15% आणि दिल्लीतील 7% आहेत. तर 3% परदेशी महिलांचा समावेश असून त्या बांगलादेशातील आहेत. नेपाळ, थायलंड, उझबेकिस्तान आणि रशियातील महिलांचे काही तपशीलही पोलिसांना मिळाले आहेत.
आरोपींना घातल्या बेड्या सायबराबादचे आयुक्त एम स्टीफन रवींद्र यांनी या टोळीबद्दल सांगितले, अनंतपूर आणि बंगळुरूमधील टेलिकॉलर वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर आरोपी फोटो पोस्ट करायचे. त्यांनी सेक्स रॅकेटचे सूत्रधार आणि कमिशनसाठी ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून देखील काम केले. ज्या महिलेचा फोटो ग्राहकांना आवडला असेल, तिला खास फ्लॅट किंवा हॉटेलच्या रूममध्ये पाठवले जायचे. याची माहिती मिळताच पोलिसांनी हैदराबाद, अनंतपूर आणि बंगळुरू येथे तपास सुरू केला आणि आरोपींना ताब्यात घेतले. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सेक्स रॅकेट चालवण्यात सहकार्य करणाऱ्या डझनहून अधिक लोकांना अटक केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"