Ranchi News: झारखंडची राजधानी रांचीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत राहुल मिंज नावाच्या तरुणाचा मृतदेह त्याच्या कबरीतून बाहेर काढण्यात आला. मृत तरुण राहुल मिंज याचे अवशेष पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरुन राहुलचा मृत्यू नैसर्गिक होता की, त्याची हत्या झाली, हे समोर येईल.
राहुल मिंज सराईतांडा, रांची येथील रहिवासी असून तो दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. गेल्यावर्षी 2 जून 2022 रोजी राहुल त्याच्या मित्रांसह टाऊनशिपमध्ये एका लग्न समारंभात गेला होता. तिथे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचे कारण जास्त मद्यसेवन आणि हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले.
राहुलच्या नातेवाइकांनी झारखंड हायकोर्टात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अर्ज दाखल केला असून, त्याची हत्या जमीन हडपण्यासाठी झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. उच्च न्यायालयाने दाखविलेल्या कठोरतेनंतर लालपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी ममता कुमारी आणि न्यायदंडाधिकारी अमित भगत यांच्या उपस्थितीत राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उच्च न्यायालयाने मृत तरुणाच्या मृतदेहाचा फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम तपास अहवाल 27 जून रोजी उच्च न्यायालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. भूमाफियांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची जमीन हडपण्याच्या उद्देशाने राहुलची हत्या केल्याचा मृताची बहीण कुसुम मिंजचा आरोप आहे.