नवी दिल्ली - दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठापुढे केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी तर ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जोरदार युक्तिवाद केला.
केजरीवाल यांच्याविरोधात ईडीपाशी कोणताही पुरावा नाही. अटक करण्यापूर्वी नियमाप्रमाणे जबाब नोंदवून घेतलेला नाही. केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीला अटक करण्याची गरज का भासली? हे अजेंडा राजकारण आहे, असे आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केले. केजरीवाल यांच्या अटकेचा संबंध लोकसभा निवडणुकीशी असल्याचा आरोप सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, केजरीवाल या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. मद्य धोरणातील गुन्हा त्यांच्याच माध्यमातून झाला असून आम आदमी पार्टी पैशाची मुख्य लाभार्थी आहे.