बिजनौर
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मालकीची ७३ किलो चांदी गेल्या ५० वर्षांपासून बिजनौरच्या जिल्हा कोषागारात आहे. पण आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच त्यावर दावा केलेला नाही. सध्याच्या दरानुसार चांदीची किंमत सुमारे ३३ ते ३४ लाख रुपये इतकी आहे.
चांदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सुपूर्द करण्यासाठी कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने पत्रंही लिहिली गेली आहेत. पण रिझर्व्ह बँकेनेही ती खासगी मालमत्ता असल्याचं सांगत ती ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यानंतर राज्य सरकारकडूनही मत मागवण्यात आलं होतं, पण तिथून कोणताही प्रतिसाद न आल्याने इंदिरा गांधींच्या मालकीची चांदी बिजनौरच्या तिजोरीत अजूनही पडून आहे.
खरंतर आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण बिजनौरमधील कलागढ येथे बांधलं जाणार होतं. त्याचं बांधकाम चालू होतं आणि त्याबाबत आभार मानण्यासाठी बिजनौरच्या लोकांनी 1972 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कालागडला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. या बैठकीत कालागड धरणाच्या कामासाठी काम करणाऱ्या कामगारांनी व जिल्ह्यातील जनतेनं इंदिरा गांधींची चांदीनं तुला केली होती. ज्याचं वजन सुमारे ७२ किलो इतकं होतं. यासोबतच इतर काही भेटवस्तूंसह एकूण वजन ७३ किलोपर्यंत पोहोचलं होतं.
बिजनौरच्या कोषागारात चांदी सुरक्षितचांदीनं तुला झाल्यानंतर तेथून निघताना इंदिरा गांधींनी ही भेट सोबत घेतली नाही. तत्कालीन प्रशासनानं ही चांदी बिजनौरच्या जिल्हा तिजोरीत ठेवली आणि तेव्हापासून आजतागायत इंदिरा गांधींचा हा ऐवज तिथंच ठेवण्यात आला आहे. तसंच कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने चांदी परत करण्यासाठी पत्रंही लिहिली गेली, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या 50 वर्षांपासून तिजोरीत चांदी पडूनदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यानं दावा केला तरच ही चांदी परत करता येईल, असं जिल्ह्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी सूरज कुमार सिंह यांचं म्हणणं आहे. कोषागाराच्या नियमानुसार कोणतीही खासगी मालमत्ता एका वर्षापेक्षा जास्त काळ तिजोरीत ठेवता येत नाही. परंतु ही मालमत्ता मागील ५० वर्षांपासून जतन करुन ठेवण्यात आली आहे.