राम मगदूम -बेळगाव : गोकाकच्या जारकीहोळी बंधूंचा दबदबा यावेळीही बेळगाव जिल्ह्यात कायम राहिला. विद्यमान आमदार तिघे सख्खे भाऊ यावेळीही पुन्हा विजयी झाले. दोघे भाजपाकडून तर एक काँग्रेसकडून विधानसभेच्या सभागृहात जात आहेत. धाकटा सध्या विधान परिषद सदस्य आहे. एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याची कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण आहे.
बेळगावचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे १९९९ मध्ये ते ‘काँग्रेस कडून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सहाव्यांदा ते भाजपकडून ‘गोकाक’मधून विजयी झाले आहेत.
माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी हे यावेळी भाजपकडून आरभावीमधून पाचव्यांदा निवडून आले आहेत. माजी मंत्री व कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डीमधून निवडून चौथ्यांदा विजयी झाले. तर, लखन हे २०२१ मध्ये विधान परिषदेवर अपक्ष निवडून आले आहेत.
नास्तिकाचा विजयी चौकार !गेल्यावेळी प्रचाराला न जातादेखील विजयी झालेल्या सतीश यांनी यावेळी अशुभ मानल्या जाणाऱ्या ‘राहू काळात’ उमेदवारी अर्ज भरला, स्मशानभूमीत प्रचार सभा घेतली. त्यांच्या विजयी चौकाराबरोबरच अशा गोष्टींचीही विशेष चर्चा आहे.