नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र ‘यशोभूमी‘च्या (आयआयसीसी) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. द्वारका, दिल्ली येथे बांधलेले हे जगातील अशा प्रकारचे सर्वात मोठे केंद्र आहे. यशोभूमीमध्ये परिषदा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण परिसंस्था आहे आणि अनेक लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी तत्पूर्वी द्वारका सेक्टर-२१ ते यशोभूमी द्वारका सेक्टर-२५ पर्यंत मेट्रो लाइन विस्ताराचे उद्घाटन केले. नवीन यशोभूमी द्वारका सेक्टर-२५ भूमिगत स्थानक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट जोडले जाईल.
खर्च ५४०० कोटीसुमारे ५४०० कोटी रुपये खर्चून २१९ एकरांवर यशोभूमी (कन्व्हेन्शन सेंटर) बांधण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रगती मैदानावर असलेला ‘भारत मंडपम’ १२३ एकरवर तयार करण्यात आला आहे.
एकाच वेळी ३००० गाड्यांचे पार्किंगयशोभूमीमध्ये तयार करण्यात आलेल्या भूमिगत पार्किंगमध्ये एकाच वेळी ३००० कार पार्क करता येणार आहेत. या केंद्रात सांडपाणी पाणी पुन्हा वापरले जाऊ शकते. जलफेरभरणाचीही सोय आहे.
यशोभूमीची वैशिष्ट्ये...९.० लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधलेल्या केंद्रात १५ अधिवेशन कक्ष आहेत.आठ मजल्यांच्या केंद्राच्या छताला निळ्या रंगाची रचना आहे.यशोभूमी केंद्रामध्ये १३ बैठक खोल्या आहेत. परिषद सभागृहात ११००० पेक्षा जास्त लोक बसू शकतात.