लाेकमत न्यूज नेटवर्कमथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वे दुर्घटनेच्या संयुक्त तपास अहवालात चालक रेल्वे चालवताना मोबाईल फोनवर काहीतरी पाहत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो सौम्य नशेच्या अवस्थेत होता, असेही तपास अहवालात नमूद केले आहे.
चालकाच्या चुकीमुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली होती असे सूत्रांनी सांगितले. ही चूक ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टिम’च्या माध्यमातून उघड झाली. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, असे त्यात म्हटले आहे. यानंतर रेल्वे कर्मचारी सचिन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्या एक्सलेटरवर ठेवली आणि त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागली अन् हा अपघात झाला.
दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आधीच उतरले होते. मंगळवारी रात्री १०.५५ च्या सुमारास लोको पायलट इंजिन बंद करून ते पार्क करत असताना हा अपघात झाला. प्लॅटफॉर्मवर रेल्वे इंजिनच्या प्रवेशापासून काही अंतरावर ओएचई लाईनचा पोल लावण्यात आला होता, त्यामुळे ट्रेनचे इंजिन त्यावर आदळले आणि थांबले. त्यामुळे अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.
विचित्र अपघातमथुरा जंक्शनवर शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंजिन प्लॅटफार्मवर येताच प्लॅटफार्मवरील प्रवासी पळून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.