मेरठ : तरुणीचं लग्न जमल्याचं कळताच तिचा प्रियकर थेट घरी आला. दोघांची भेट झाल्यानंतर तरुण आपल्या प्रेयसीला घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र सदर तरुण ज्या कारमधून आला होता, त्या कारचालकाला प्रेमीयुगुलाच्या हालचालींचा अंदाज येताच त्याने कार थेट पोलिस ठाण्यात नेल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठ इथं घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रेमीयुगुलाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि त्यांच्या कुटुंबियांना याबाबत कल्पना दिली.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील जयपूर शहरातील बनार गावचा रहिवासी असलेल्या हितेश या तरुणाची मुजफ्फरनगर येथील एका तरुणीशी सोशल मीडियातून ओळख झाली होती. नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र काही दिवसांपूर्वी सदर तरुणीचं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न जमलं होतं. हे कळताच हितेशने एक कॅब घेऊन थेट मेरठ गाठलं आणि तो आपल्या प्रेयसीला भेटला. तिथं दोघांची चर्चा झाल्यानंतर हितेशने कारचालकाला पुन्हा मेरठकडे निघण्यास सांगितलं. मात्र हितेशसोबतची तरुणी काहीशी घाबरलेली होती. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, असं चालकाने हितेशला विचारला. त्यावर हितेशने समाधानकारक उत्तर न दिल्याने काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने कार थेट एका पोलीस ठाण्यात घातली.
पोलीस ठाण्याच्या बाहेर जाताच कारचालक मोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकल्याने पोलीस बाहेर आले. त्यानंतर या सर्व प्रकाराचा माहिती कारचालकाने पोलिसांना दिला. पोलिसांच्या चौकशीत हितेश आणि सदर तरुणीचं दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांच्या परवानगीविनाच ते पळून चालल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली.
दरम्यान, तरुणीचं लग्न जमल्याने घरी तिच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच हा प्रकार उघड झाल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.