लोकसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सुप वाजणार आहे. सारे पक्ष निवडणुकीचा तयारी करण्यात गुंतले आहेत. जागा वाटप, कुरघोड्या, पक्ष प्रवेश आदी केले जात आहेत. अशातच निवडणूक आयोगाने देखील मोठी तयारी केली आहे.
देशभरात गेल्या कित्येक महिने मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पुनर्रचना आदी गोष्टी करण्यात येत होत्या. आता निवडणूक आयोगाने मतदारांचा आकडा फायनल केला आहे. आज निवडणूक आयोगाने सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील मतदारांशी संबंधित विशेष समरी रिव्हिजन २०२४ रिपोर्ट जारी केला आहे.
मतदार यादीत १८ ते २९ वर्षातील दोन कोटी नवमतदार जोडले गेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. जगात सर्वाधिक ९६.८८ कोटी मतदार लोकसभा निवडणुकीसाठी नोंदणीकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सोबतच लिंग रेशो ९४० वरून वाढून ९४८ झाला आहे. 2.63 कोटी नवीन मतदार जोडले गेले आहेत.
तर मृत, दुसऱ्या जागी स्थलांतरीत झालेले आणि डुप्लिकेट मतदार असे १.६५ कोटी मतदार हटविण्यात आले आहेत. आयोगाला तब्बल २२ लाख डुप्लिकेट व्होटर्स सापडले आहेत.