'निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागतोय,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:32 AM2023-03-20T07:32:33+5:302023-03-20T07:34:34+5:30
पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही, ठाकरे गटाचा आरोप.
‘देशाच्या लोकशाहीची ही सध्याची अवस्था आहे. हिंदुस्थानात लोकशाही मारली जात आहे असे राहुल गांधी परदेशात बोलून गेले. आता त्यांनाही देशविरोधी ठरवून किंमत मोजावी लागेल. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. हे कसले लक्षण मानायचे? देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे. वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे,’ असे म्हणत ठाकरे गटानं भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
‘निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे,’ असा आरोपही त्यांनी सामनाच्या संपादकीयमधून केलाय.
काय म्हटलंय संपादकीयमध्ये?
‘देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींवर अखेर तोंड उघडले आहे. अदानी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठय़ा भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली,’ असे यात नमूद करण्यात आलेय.
‘शहा यांची ही विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे. अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शहा सांगतात. मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याच वेळी कायदामंत्र्यांनी, रिजिजू यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत,’ असे यात म्हटलेय.
… तोवर जिंकता येत नाही
‘मुळात देशविरोधी टोळी म्हणजे काय व त्यात कोण सामील झाले? सरकारी निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करणे हे ज्यांना देशद्रोही कृत्य वाटू लागते ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक आहेत. त्यामुळे देशाचे गृहमंत्री व कायदामंत्री ‘लोकशाही’, ‘स्वातंत्र्य’, ‘तटस्थता’ वगैरे शब्दांचा वापर करून जो गोंधळ घालीत आहेत तो पटणारा नाही. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही कायदामंत्री रिजिजू यांनी विरोध दर्शविला. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे. जगातील सर्व देशांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान बंद केले. कारण त्यात घोटाळे होत आहेत, पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही,’ असा आरोपही संपादकीयमधून करण्यात आलाय.