लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर उत्तर दिले आहे.
आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. देशात ६४ कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगत आम्ही या निवडणुकीत जागतिक रेक़ॉर्ड बनविले असल्याचा दावा केला आहे. देशातील मतदारांची संख्या जगातील २७ देशांपेक्षा जास्त आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही भारतीय मतदारांचे उभे राहून आभार मानतो. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. 1.5 कोटी मतदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 135 विशेष गाड्या, 4 लाख वाहने आणि 1692 विमानांचा वापर करण्यात आला. मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
मतदान कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा देखील कुमार यांनी दाखला दिला आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून काय जात असेल याची कल्पना करा, असा सल्लाही निवडणूक आयुक्तांनी दिला. जम्मू-काश्मीरमध्ये 4 दशकात सर्वाधिक मतदान झाले आहे. खोऱ्यात ५८.५८% आणि जम्मूमध्ये ५१.०५% मतदान झाले. याच आधारावर पुढील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
केवळ 14 ठिकाणी फेरमतदान घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 27 राज्ये अशी होती जिथे पुन्हा मतदानाची गरज वाटली नाही. कडाक्याच्या उन्हातही लोकांनी मतदान केले. मणिपूरमध्येही लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि हिंसाचार झाला नाही, असेही राजीव कुमार म्हणाले.