भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्याने आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होतील, याबाबत भाजपा कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळत असलेल्या भाजपाच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तसेच आता महाराष्ट्रव विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे. तसेच जानेवारी २०२५ मध्ये भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.
२०१९ मध्ये अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर जे. पी. नड्डा यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाली होती. नड्डा यांचा कार्यकाळ हा गेल्यावर्षी संपला होता. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड अद्याप होऊ न शकल्याने जे.पी. नड्डा यांना आता पुन्हा एकदा नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.