Herald House Seal : ईडीकडून हेराल्ड हाऊस सील, परवानगीशिवाय कार्यालय उघडता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:49 PM2022-08-03T18:49:04+5:302022-08-03T18:52:57+5:30
Herald House Seal : ईडीच्या या कारवाईनंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपासाचा भाग म्हणून दिल्लीतील हेराल्ड हाऊस सील केले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात ईडी सक्रिय आहे. दोन दिवसांपासून ईडीने हेराल्ड हाऊससह दिल्लीतील अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या संदर्भात ईडीने राष्ट्रीय राजधानीत 12 ठिकाणी आणि इतर ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही कारवाई केली आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण आर्थिक अनियमिततेशी संबंधित असून सुमारे नऊ महिन्यांपूर्वी त्याची नोंद करण्यात आली होती.
Delhi | The Enforcement Directorate seals the National Herald office, instructing that the premises not be opened without prior permission from the agency. pic.twitter.com/Tp5PF5cnCD
— ANI (@ANI) August 3, 2022
सोनिया गांधींची झाली होती चौकशी
ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 27 जुलै रोजी जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी हे छापे टाकले होते. याप्रकरणी सोनिया गांधींच्या चौकशीची ही तिसरी फेरी होती. ईडीने सोनिया गांधींना समन्स बजावल्यानंतर, सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी देशभरात निदर्शने केली होती.
याआधी ईडीने 26 जुलै रोजी सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यावेळी मुलगी प्रियंका गांधी वड्रासोबत त्या ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी सोनिया गांधींना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील त्यांच्या सहभागाबद्दल सुमारे 30 प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले होते.
राहुल गांधी यांचीही पाच दिवस चौकशी
या प्रकरणी ईडीने राहुल गांधी यांचीही पाच दिवस चौकशी केली होती. ईडीने 13 जून ते 15 जून असे सलग तीन दिवस राहुल गांधी यांची 27 तासांपेक्षा जास्त चौकशी केली आणि 20 जूनला त्यांना पुन्हा समन्स बजावले. 20 जून रोजी त्यांची जवळपास 14 तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधींनी 13 जून रोजी पहिल्यांदा ईडीच्यासमोर हजर झाले होते. त्यांनी सुरुवातीला 16 जूनला हजर राहण्यापासून सूट मागितली होती, त्यानंतर 17 जूनला त्यांना बोलावण्यात आले होते.