भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे घरात घुसून महिला डीएसपीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या महिला अधिकाऱ्याला इतर कोणी नाही, तर त्यांच्या इंजिनिअर पतीनेच मारहाण केली. पीडित महिला डिसीपी यांच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा पच्चसिया असे महिला अधिकाऱ्यानं नाव असून त्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.
नेहा यांचा 2019 साली कुणाल जोशी यांच्यासोबत विवाह झाला होता. जोशी हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत. मात्र, नेहा त्यांच्यापासून वेगळ्या राहत आहेत, दोन दिवसांपूर्वी पती कुणाल हे त्यांच्या घरी आले आणि जबरदस्तीने घरात घुसून वाद घातला. या वादात पतीने नेहा यांना जोरदार धक्का दिला, त्यावेळी नेहा यांचे डोके भींतीवर आदळले गेले. याप्रकरणी नेहा यांनी हबीबगंज पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मी माझ्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो होते, असे पतीने पोलिसांना जबाबात सांगितले.
दरम्यान, नेहा पच्चसिया यांना दोन जुळी मुले आहेत. पती कुणाल जोशी हे छोला मंदिराजवळ राहतात, ते नशेच्या आहारी असल्याचा आरोप पत्नी नेहा यांना केला आहे. या दोन्ही पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. सध्या त्यांची दोन्ही जुळी मुले नेहाजवळच असतात.