ॲमेझॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नको तिथे चलाखी दाखवत कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंडा घालून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीने या कर्मचाऱ्याकडे ज्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानेच त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांमधील रकमेवर डल्ला मारला. त्याने एक दोन नव्हे तर तर तब्बल २०० लोकांना आपली शिकार बनवलं आणि कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली. तब्बल ८ वर्षे हेराफेरीचा हा खेळ सुरू होता. दरम्यान, बिंग फुटू नये म्हणून या कर्मचाऱ्याने ॲमेझॉनमधील नोकरी सोडली. त्यानंतर त्या ने स्वत:ला लपवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र सायबराबाद पोलिसांनी अखेरीस त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मेट्टू वेंकटेश्वरलू हैदराबादमधील गाचीबाउली येथील ॲमेझॉन डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सीनियर फायनान्शियल ऑपरेशनल अॅनॅलिस्ट म्हणून काम करत होता. इथे त्याने ८ वर्षांमध्ये सुमारे १८४ कर्मचाऱ्यांचा खिसा कापत ३.२ कोटी रुपयांवर डल्ला मारला. मेट्टू याच्याकडे कर्मचाऱ्यांचा पगार पाहणं आणि नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत फूल अँड फायनल सेटलमेंट करण्याची जबाबदारी होती.
आरोपी मेट्टू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट ईमेल, चुकीची बँक स्टेटमेंट आणि जुन्या कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेबाबत एक प्लॅन आखला. त्यामधून कोट्यवधी रुपये त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. यामध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष करून गंडा घालण्यात येत असे. आरोपी मेट्टू याने अशा कर्मचाऱ्यांची संपूर्ण आकडेवारी गोळा केली आणि त्यांना देणे असलेली रक्कम आपल्या नावाने ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली.
वेंकटेश्वरलू याने ज्यांची देय रक्कम बऱ्याच काळापासून थकीत होती, अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवली. त्यानंतर कंपनी सोडणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांचं बँक खातं बदललं. तसेच त्यांची वर्किंग फाईल तयार केली. तसेच त्यांची वर्किंग फाईल तयार करून आपले मित्र, नातेवाईक यांची खाती जोडली. त्यानंतर थकीत रक्कम कर्मचाऱ्यांचा खात्यात न टाकता ती आपल्या ओळखीच्या लोकांच्या खात्यामध्ये वळवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ८ वर्षांमध्ये कंपनी सोडणाऱ्या १८४ कर्मचाऱ्यांना गंडा घातला. तसेच फायनान्शियल स्टेटमेंटनंतर जे पैसे या कर्मचाऱ्यांना मिळणार होते, ते बनावट पद्धतीने मित्र आणि नातेवाईकांच्या खात्यांमध्ये वळवले. हे पैसे ५० वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवण्यात आले. आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच आतापर्यंत ३.२ कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.